चिरंजीवपद

।। हरी ॐ तत्सत ।। संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजकृत ।। सार्थ चिरंजीवपद ।। (साधकांना धोक्याची सूचना) चिरंजीव पद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी । किंचित बोलेन निश्चयेंसी । कळावयासी साधका ॥१॥ "चिरंजीवपद" म्हणजे अविनाशी व अवीट असे निरतिशय-आनंदरूप-मोक्ष सुख ! याची प्राप्ती होण्यासाठी साधकाला कोणता अधिकार लागतो. हे त्यांना समजण्यासाठी निश्चयपूर्वक थोडेसे सांगतो. ।।१।। आधीं पाहिजे अनुताप । तयासें कैसें स्वरुप । नित्य मृत्यु जाणे समीप । न मनीं अल्प देह सुख ॥२॥ यात मुख्यतः 'अनुताप' (म्हणजे प्राप्त परिस्थिती अनिष्ट म्हणून तळमळ व इष्ट परिस्थितीची अनिवार ओढ) पाहिजे असतो. त्या अनुतापाचे स्वरूप काय? तर मृत्यू केव्हा उडी घालील याचा नेम नाही. असे जाणून तो देहविषयक सुखलालसा सोडून देतो. ।।२।। म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला । तो म्यां विषय भोगी लाविला । थिता परमार्थ हातीचा गेला । करीं वहिला विचार ॥३॥ तो म्हणतो, देवाने हा...