Posts

हरीचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ।।१।।

Image
🌷🌱अभंग नाथांचे🌱🌷 हरीचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ।।१।। येती नेमें पंढरीसी । दरूशन घेती विठ्ठलासी ।।२।। करिती चंद्रभागे स्नान । पूर्वजा उध्दरतीं जाण ।।३।। करिती गोपाळकाला । गोपाळपुरी मिळोनि मेळा ।।४।। ऐसा जया घडे नेम । एका जनार्दनीं निष्काम ।।५।। 🌺🌾भावार्थ :-🌾🌺 हरीचे दास पंढरीस नित्यनेमाने येऊन विठ्ठलाचे दर्श़न घेतात. चंद्रभागेचे स्नान करुन लाभलेल्या पुण्यफलाने पूर्वजांचा उध्दार होतो. गोपाळपुरीं एकत्र जमून गोपाळकाला करतात. असा नेम ज्यांना घडतो ते भक्त निष्काम कर्मयोगी आहेत असे एकनाथ महाराज म्हणतात. 🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩

न जायेचि ताठा नित्य खटाटोप ।

Image
।। ॐनमो सद्गुरू एकनाथाय नमः।।      🔴अभंग आठरावा🔴 न जायेचि ताठा नित्य खटाटोप । मण्डुकीं वटवट तैसे ते गा ॥ १ ॥ प्रेमावीण भजन नाकाविण मोती । अर्थाविण पोथी वाचुनी काय ॥ २ ॥ कुंकवा नाहीं ठावे म्हणे मी आहेव । भावावीण देव कैसा पावे ॥ ३ ॥ अनुतापेवीण भाव कैसा राहे । अनुभवें पाहें शोधूनियां ॥ ४ ॥ पाहतां पाहणें गेलें तें शोधूनी । एका जनार्दनीं अनुभविलें ॥ ५ ॥ 🌷🌻🍁भावार्थ🍁🌻🌷 (अध्ययनाचे) खटाटोप नेहमी चालू आहेत, पण अंगातील ताठा जर जात नसेल तर अरे, मग ते अध्ययन बेडकाच्या बडबडी प्रमाणेच आहे. ।।१।। प्रेमाशिवाय भजन, नाकाशिवाय मोती व अर्थाशिवाय पोथी वाचणे हे फुकट नाही काय ?. ।।२।। कुंकवाला तर ठिकाण नाही आणि मी सौभाग्यवती आहे असे म्हणते ! आणि तसा भाव तर नाही मग देव कसा प्राप्त होईल?. ।।३।। अनुतापावाचून भाव कसा राहील? हे अनुभवाने तू शोधून पहा. ।।४।। शोध करू गेले असता पाहणारा आणि पाहणे हे दोन्ही जातात. हे मी अनुभवले, असे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात. ।।५।। 🌼🙏आपला दासानुदास 🙏🌼

काय पद्मनीचे षंढासी सोहळे ।

Image
 श्री संत एकनाथ महाराजकृत                         हरिपाठ 🌾🌺 अभंग सतरावा 🌺🌾 काय पद्मनीचे षंढासी सोहळे । वांझेसी डोहाळे कैची होती ॥ १ ॥ अंधापुढें दीप खरासी चंदन । सर्पासी दुधपान करूं नये ॥ २ ॥ क्रोधि अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये ॥ ३ ॥ खळाची संगती उपयोगासी न ये । आपणा अपाय त्याचे संगे ॥ ४ ॥ वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी । एका जनार्दनीं तेचि भले ॥ ५ ॥ 🍀🌷🌻🍁 भावार्थ 🍁🌻🌷🍀 नपुंसकाला पद्मिनीचे सोहळे काय? वांज स्त्रीला डोहाळे कुठले होणार? ।।१।। आंधळ्यांपुढे दिवा ठेऊ नये, गाढवाला चंदन लावू नये, सर्पाला दूधपान करू नये. (कारण तसे केले तरी त्याचा त्यांना काय उपयोग ?) ।।२।। जो क्रोधी अविश्वासी आहे त्यास बोध कोठून होणार? म्हणून त्याला बोध करून आपल्या वाणीला शिण देऊ नये. ।।३।। दुष्ट  लोकांची संगती आपल्याला केव्हाही उपयोगी पडणार नाही. उलट त्यामुळे आपला घात मात्र होईल. ।।४।। जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, ज्या वैष्णवांनी असे हे कुपथ्य दूर फेकून दिले तेच शहाणे होत. ।।५।। 🌼🙏आपल...

घडती पुण्याचिया रासी ।

Image
🌾🌱🌾 अभंग 🌱🌾🌱 घडती पुण्याचिया रासी । जे पंढरीसी जाती नेमें ।।१।। घडतां चंद्रभागे स्नान । आणि दरूशन पुंडलिक ।।२।। पाहतां विटेवरी जगदीश । पुराणपुरूष व्यापक ।।३।। वारकरी गायी सदा । प्रेमे गौविंदा आळविती ।। ४ ।। तया स्थळीं मज ठेवा. । आठवा जनीं जनार्दन ।।५।। शरण एका जनार्दन । करा माझी आठवण ।।६।।    💦🌾💦भावार्थ 💦🌾💦 जे भाविक नित्यनेमाने पंढरीची वारी करतात त्यांच्या पुण्याचा राशींनी संचय होतो . या भाविकांना चंद्रभागेचे स्नान घडते, भक्त पुंडलिकाचे दर्शन घडते. चराचरात व्यापलेल्या पुराणपुरुष जगदीशाचे ध्यान याच देही याचडोळां बघावयास मिळतें. वारकरी सतत विठुनामाचा घोष करुन देवाला आळवतात . त्यां पवित्र स्थळीं निवास लाभावा अशी इच्छा व्यक्त करुन एकनाथ महाराज सद्गुरु जनार्दन स्वामींना शरण जातात. 🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩

श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ

Image
।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।।        🔴अभंग सोळावा🔴 कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणे हरी ॥ १ ॥ दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥ २ ॥ इच्छावे ते जवळी चरण हरीचे । चरण सर्व नारायण देतो तुज ॥ ३ ॥ न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतां जन्म कोटी हरि कैंचा ॥ ४ ॥ एका जनार्दनीं सांपडली खूण । कल्पना अभिमान हरि झाला ॥ ५ ॥ 🍀🌷🌻🍁भावार्थ🍁🌻🌷🍀 कल्पनेमुळे इच्छांचा जो साठा तयार झाला त्यामुळे गुंतडा ( अडथळा) निर्माण होतो, म्हणून हरी जाणला जात नाही. ।।१।। दिल्याशिवाय फळाचा लाभ कसा होणार? हे बाबा ? नुसत्या कल्पनेने इच्छा करीत राहणे फुकट आहे. ।।२।। देवाचे चरण जवळ असावे अशीच इच्छा करावी नारायण तुला सर्व देईल. ।।३।। कल्पना व अभिमानाची गाठ जर सुटली नाही तर कोट्यवधी जन्म घेतले तरी हरीची प्राप्ती कशी होणार? ।।४।। जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरीचा जप करणे ही खूण मला सापडली व त्यायोगे माझ्या ठिकाणची कल्पना व अभिमान हरिरुप झाला. ।।५।। 🌼🙏आपला दासानुदास 🙏🌼

श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ

Image
                🔴अभंग पंधरावा🔴 ।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।। एक तीन पांच मेळा पञ्चवीसांच । छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ॥ १ ॥ कल्पना अविद्या तेणे झाला जीव । मायोपाधी शिव बोलिजेति ॥ २ ॥ जीव शिव दोन्ही हरिरूपीं तरंग । सिंधु तो अभंग नेणें हरी ॥ ३ ॥ शुक्तीवरी रजत पाहतां डोळां दिसे । रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ॥ ४ ॥ क्षेत्र-क्षेत्रज्ञातें जाणताती ज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥ 🌷🌻🍁भावार्थ🍁🌻🌷 कोणी म्हणावं संसार एक तत्वाचा, कोणी तीन तत्वाचा, कोणी पाच तत्वाचा, कोणी पंचवीस तत्वाचा व कोणी छत्तीस तत्वाचा आहे. असे मानतात..! परंतु, ह्या सर्व तत्वांचे मूळ एक हरिच आहे. ।।१।। अविद्यारुपी कल्पनेमुळे चैतन्य जीव दशेला प्राप्त होते, आणि मायोपाधीमुळे ते शिव म्हटले जाते. ।।२।। पण जीव व शिव ह्या दोन्ही हरी स्वरूपावरील लाटा आहेत, मूळ समुद्र सारखा हरी अभंगच आहे. आपल्यावर ह्या लाटा उत्पन्न होतात, हे तो जाणतच नाही. ।।3।। शिंपल्याकडे बघतांना डोळ्याला रुप्याचा भास होतो व दोरीकडे बघतांना सापाचा भास होतो. (तसेच हरिस्वरूपाच्या ठिकाणी जीव शिवाचा भा...

श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ

Image
       🔴अभंग चौदावा🔴 ।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।। हरि बोला देतां हरि बोला घेतां । हांसतां खेळतां हरि बोला ॥ १ ॥ हरि बोला गातां हरि बोला खातां । सर्व कार्य करितां हरि बोला ॥ २ ॥ हरि बोला एकांतीं हरि बोला लोकांतीं । देहत्यागाअंतीं हरि बोला ॥ ३ ॥ हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां । उठतां बैसतां हरि बोला ॥ ४ ॥ हरि बोला जनीं हरि बोला विजनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥ 🍀🌷🌻🍁 भावार्थ🍁🌻🌷🍀 देतांना, घेतांना, हसतांना, खेळतांना हरीचा जप करा. ।।१।। गातांना, खातांना, फार काय, सर्व कामे करतांना हरीचा जप करा. ।।२।। एकांतात, लोकांशी व्यवहार करीत असतांना व देह त्याग करण्याच्या शेवटच्या घटकेला हरी हरी म्हणा. ।।३।। भांडताना, कांडतांना, उठतांना, बसतांना हरी हरी म्हणा. ।।४।। जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, जनात, वनात हरी म्हणा. ।।५।। (तात्पर्य, मनुष्याने सर्वकाळ कोणतेही कार्य करीत असतांना हरी हरी म्हणावे.) 🌼🌻🙏आपला दासानुदास 🙏🌼🌻