शरीर दुःखाचें कोठार

||सार्थ तुकाराम गाथा ||
||अभंग क्रमांक ||४०३२||
                 
                    **
 शरीर दुःखाचें कोठार |
शरीर रोगाचे भांडार |
शरीर दुर्गंधीची थार |
नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ||१||
शरीर उत्तम चांगलें |
शरीर सुखाचें घोसुलें |
शरीरें साध्य होय केलें |
शरीरें साधलें परब्रह्म ||२||
शरीर विटाळाचें आळें |
माया मोह पाश जाळें |
पतन शरीराच्यामुळें |
शरीर काळें व्यापिलें ||३||
शरीर सकळहि शुध्द |
शरीर निधींचाहि निध |
शरीरें तुटे भवबंध |
वसे मध्यभागीं देव शरीरा ||४||
शरीर अविद्येचा बांधा |
शरीर अवगुणांचा रांधा |
शरीरीं वसे बहुत बाधा | 
नाहीं गुण सुधा एक शरीरीं ||५||
शरीरा दुःख  नेदावा भोग |
न द्यावें सुख न करीं त्याग |
शरीर चोखटें ना चांग |
तुका म्हणे वेग करीं हरिभजनीं ||६||
💫💫भावार्थ💫💫
           हे शरीर दुःखाचे कोठार , रोगांचे भांडार ,दुर्गंधीचा आश्रय असून शरीराइतके अपवित्र जगात दुसरे काहीही नाही .||१||
                हे मनुष्यशरीर परमार्थ केला तर चांगले व उत्तमही आहे .सुखाचा घड आहे .या शरीराने वाटेल ते साध्य होते .याच शरीराने परब्रह्माचीही प्राप्ती होते .||२||
             हे शरीर स्रियांच्या विटाळाने आळविलेला एक पिंड आहे , स्रीपुरूषांची सुंदर शरीरे एकमेकांना आकर्षण करणारी आणि प्रेम , अविवेक यांच्या जाळ्यात अडकविणारी असतात .पाप केले , तर या शरीरामुळेच अधःपात होतो .हे शरीर काळाने व्यापले आहे .||३||
        परमार्थदृष्टीने हे शरीर निधानांचेही निधान आहे .या शरीरानेच भवबंधाची निवृत्ती होते .या शरीरातच देव राहतो .||४||
            हे शरीर अविद्येचे कार्य आणि अवगुणांचा परिपाक आहे .या शरीरात पुष्कळच आधीव्याधीचे दुःख राहते .या शरीरात एकसुध्दा चांगला गुण नाही .||५||
             तुकाराम महाराज म्हणतात , या शरीराला दुःख देऊ नये आणि सुखही देऊ नये ,या शरीराचा त्यागही करू नये आणि भोगही घेऊ नये .कारण , या शरीराने संसार केला , तर ते अत्यंत वोखटे आहे ;आणि परमार्थ केला तर फारच गोमटे आहे .म्हणून तातडीने हरीभजनाकडे या शरीराचा विनियोग करावा .||६||
||जय विठ्ठल ||जय तुकोबाराय ||

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास