बारा सोळा जनी हरि सी नेणती
ओम नमो एकनाथाय नमः
अभंग २१ वा.
बारा सोळा जनी हरि सी नेणती ।
म्हणोनी फिरती रात्रंदिवस ।। १ ।।
सहस्र मुखाचा वर्णिता भागला ।
हर्ष जया झाला तेणे सुखे ।। २ ।।
वेद जणू गेला पुढे मौनावला ।
ते गुह्य तुजला प्राप्त कैचे ।। ३ ।।
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा ।
दास सत्गुरूचा तोची जाने ।। ४ ।।
जाणते नेणते हरीच्या ठिकाणी ।
एका जनार्दनी हरी बोला ।। ५ ।।
भावार्थ
सूर्याच्या बारा कला आणि चंद्राच्या सोळा कला हरीला न जाणता अजुनहि रात्रंदिवस फिरत आहेत .
हजार मुखांचा शेष हि हरीचे गुण वर्णन करता करता थकला, परंतु ते वर्णन करण्याच्या सुखानेच त्याला आनंद प्राप्त झाला.
वेद हा हरीचे स्वरूप जाणण्याकरिता पुढे सरसावला , परंतु त्याला सुद्धा स्तब्ध बसावे लागले . असे जे गूढ (ते तुला स्वत; च्या प्रयत्नाने) कसे प्राप्त होणार.
मागील जन्मी पुण्य अर्जित केले असेल व ह्या जन्मी अभ्यास पूर्ण केला असेल तसेच सदगुरूची सेवा केली असेल तोच हे गुह्य जाणू शकेल .
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, ज्ञानी असो वा अज्ञानी हे दोघे हरीच्या ठिकाणी सरते होतात, म्हणून तुम्ही हरी म्हणा..
आपला दासानुदास ....
Comments
Post a Comment