पिंडी देहस्थिती ब्रम्हांडी पसारा
ओम नमो एकनाथाय नमः
श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ
अभंग क्रमांक २२ वा .
पिंडी देहस्थिती ब्रम्हांडी पसारा ।
हरिविण सारा व्यर्थ भ्रम ।। १ ।।
शुक याज्ञावल्क दत्त कपिल मुनी ।
हरिसी जाणोनी हरीच झाले ।। २ ।।
यारे यारे धरू हरीनाम तारू ।
भवाचा सागरू भय नाही ।। ३ ।।
साधू संत गेले आनंदी राहिले ।
हरिनामे झाले कृतकृत्य ।। ४ ।।
एका जनार्दनी मांडिले दुकान ।
देतो मोलावीन सर्व वस्तू ।। ५ ।।
भावार्थ
पिंडात देहा संबंधी विचार करणे व ब्रम्हांडात जगत् रुपी पसार्याचा विचार करणे हे सर्व (पिंड ब्रम्हांडाचे)
विचार एका हरीच्या विचाराशिवाय कल्पना मात्र व्यर्थ आहे.
शुक , याज्ञावल्क, दत्त , व कपिल मुनी हे हरीला जाणून हरीच झाले .
अहो , या हो या आपण सर्वजन हरीनाम रुपी नावेचा आश्रय करू. मग संसार रूप समुद्राचे भय राहणार नाही.
याच मार्गाने साधू संत गेले व आनंद रूप जो परमात्मात तद्रूप होऊन राहिले अशा रीतीने ते हरीनाम घेऊन कृत कृत्य झाले
जनार्दन स्वामींचे शिष्य एक नाथ महाराज म्हणतात, मी हरिनामाचे दुकान मांडले आहे. त्यातून मी सर्व वस्तू फुकट देतो
Comments
Post a Comment