आवडीने भावे हरीनाम घेसी
ओम एकनाथाय नमः
श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ
अभंग क्रमांक २३ वा.
आवडीने भावे हरीनाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।। १ ।।
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा ।
पती तो लक्ष्मीचा जाणतसे ।। २ ।।
सकल जीवांचा करितो सांभाळ ।
तुज मोकलील ऐसे नाही ।। ३ ।।
जैशी स्थिती आहे तैशा परी राहे ।
कौतुक तू पाहे संचिताचे ।। ४।।
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा ।
हरी कृपे त्याचा नाश झाला ।। ५ ।।
भावार्थ
मोठ्या प्रेमाने व श्रद्धेने तू नामस्मरण कर, म्हणजे तुझी सर्वच काळजी तो परमात्मा वाहील.
तू कोणत्याही गोष्टीचा खेद मनात ठेऊ नकोस. लक्ष्मी चा पती तो श्री हरी त्याला सर्व समजते.
जो सर्व जीवांचा सांभाळ करतो, तो तुझी उपेक्षा करील असे नाही.
जी स्थिती प्राप्त आहे. तीत आनंदाने राहा. व आपल्या संचिताचे कौतुक तू पहा.
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात , भोगून संपणारे जे प्रारब्ध त्याचा हरीकृपेने नाश झाला.
आपला दास ....
Comments
Post a Comment