श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ
- श्री एकनाथमहाराजकृत हरिपाठाचे अभंग
१
हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥ १ ॥
हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥ २ ॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥ ३ ॥
हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥ ४ ॥
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
अर्थ
हरि हाच दाही दिशांना भरून राहिलेला आहे. असा श्रीहरीच्या दासांचा अनुभव असतो. (कारण) एक हरीच 'जसा ज्याचा भाव तसा त्याला अनुभवाला येतो. (हरीच्या दासांचा भाव-श्रीहरिच सर्व ठिकाणी व्यापून आहे असा असल्यामुळे तो एक हरीच त्यांना सर्व ठिकाणी अनुभवाला येतो) ।।१।।
मुखाने हरी म्हटल्याने हरीच्या दासांची चिंता संपूर्ण नाहीशी होते. यामुळे त्यांना पुनः जन्म घेण्याचे कारण उरत नाही. ।।२।।
(कारण) जन्म हा वासनेच्या संगतीमुळे घ्यावा लागतो. पण या हरिदासाची ती वासनाच हरिरुप झाल्याने त्यांना जन्म घेण्याचे कारण उरत नाही ।।३।।
हरिदास हे हरीच्या चिंतनाने हरीस्वरूप झाल्यामुळे ज्ञानाचे काम संपले आणि अज्ञान हे तर हरी स्वरूपाच्या ठिकाणी नाहीसे झालेलेच असते. ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य श्री एकनाथ महाराज म्हणतात, त्या हरी दासांच्या ध्यानात व मनात हरींचेच रूप असते.( यामुळे ते हरिरूपच बनून गेलेले असतात. एवढ्याकरिता) तुम्ही मुखाने हरी म्हणा. ।।५।। २
हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥ १ ॥
नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥ २ ॥
सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥ ३ ॥
मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥ ४ ॥
जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥ ५ ॥
अर्थ
मुखाने हरीचे नामस्मरण करा, हरीचे नामस्मरण करा, नामस्मरण करावयाचे नसेल तर निदान मौन तरी धारण करा. उगीच निरर्थक बडबड करू नका. ।।१।।
मानाची इच्छा नसावीच अभिमानही नसावा ज्याने मी तू पणा टाकला तोच सुखी होतो. ।।२।।
जो स्वतः सुखी झाला त्याने जगातील त्रिविध ताप दूर करून त्यास ( जगास) शांत करावे व अज्ञानी लोकांना चांगल्या मार्गाला नेऊन सोडावे. ।।३।।
भावभक्तीच्या सामर्थ्याने ज्यांना खरा परमार्थाचा मार्ग कळतो ते या जगाच्या मेळाव्यात दिसत नाहीत. ।।४।।
(हे एका दृष्टीने खरे आहे पण दिसत नाही म्हणावे तर काहींना) ते जनात, वनात प्रत्यक्ष दिसतात. जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, मी त्यांना ओळखले. ।।५।। ३
ओळखिला हरी धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धीसहित ॥ १ ॥
सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे । नेलें राजहंसें पाणी काय ॥ २ ॥
काय तें करावें संदेहीं निर्गुण । ज्ञानानें सगुण ओस केलें ॥ ३ ॥
केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजले मेले ऐसे किती ॥ ४ ॥
एका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरीसंगें ॥ ५ ॥
ज्याने हरीला ओळखले तो संसारात राहून सुध्दा धन्य होय, त्याच्या घरी मोक्ष सिद्धी सहित वास करतो. ।।१।।
सिद्धी मनुष्याला वेड लावते, म्हणून त्या सिद्धीची इच्छा कोण ठेवतो ? राजहंसाने दूध टाकून पाण्याचे कधी ग्रहण केले आहे का ? ।।२।।
संशयाने भरलेले निर्गुण घेऊन काय करावयाचे ? निर्गुणाच्या ज्ञानाच्या ओढीने सगुणाकडील वळण अजिबात बंद केले. ।।३।।
जे कर्म हातून घडले त्याचेच फळ मनुष्याला भोगावे लागते, असे जन्माला येऊन नुसते केल्या कर्माचे फळ भोगून मेले, असे कितीतरी लोक आहेत! (अनंत आहेत) ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरीच्या संगतीत जन्म मरणाची येरझार व तज्जन्य कष्ट नाहीत. उलट तेथे अखंड सुखाच्या विश्रांतीचा लाभ होतो. (हरीच्या संगतीने दुःखाला कारण असणारे 'जन्म मृत्यू नाहीसे झाल्यामुळे अनिष्ट अशा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते व इष्ट अशा शाश्वत सुखाची कायमची प्राप्ती होते.) ।।५।। ४
जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥ १ ॥
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥ २ ॥
वैष्णवांचें गुह्य मोक्षांचा एकांत । अनंतासी अंत पाहतां नाहीं ॥ ३ ॥
आदि मध्य अवघा हरि एक । एकाचे अनेक हरि करी ॥ ४ ॥
एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥ ५ ॥
जगातील जी जी वस्तू दिसेल ती ती ज्याला हरिरूपाने अनुभवाला येते त्याला पूजा, ध्यान, जप करण्याची आवश्यकता नाही. ।।१।।
वैकुंठात, कैलासात, तीर्थात व क्षेत्रात देव आहे. (पण खरे सांगावयाचे तर) त्या वाचून रिकामे ठिकाण कोठे आहे ? ।।२।।
आपण व हरी यातील द्वैत नाहीसे करून मोक्षरुप जो हरी तद्रूप होऊन राहणे हे वैष्णवांचे मुख्य वर्म (गुह्य) होय. (कारण) देशकालवस्तूपरिच्छेदशुन्य असा जो हरी त्याचा अंत पाहू लागले असतांना सुध्दा अंत लागत नाही. ।।३।।
सृष्टीच्या आदि, मध्य व अंती एकच एक परमात्मा सर्वत्र नटलेला आहे. एकाच हरीची अनंत रूपे आहेत व सर्व रूपात वास करणारा एकच हरी आहे. ।।४।।
माझ्या ठिकाणी जीवशिवाचे ऐक्य होईल असे (माझ्या गुरुजींनी) केले असे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात. ।।५।। ५
नामाविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा काळसर्प आहे ॥ १ ॥
वाचा नव्हे लांब जळो त्याचें जिणें । यातना भोगणें यमपुरीं ॥ २ ॥
हरीविण कोणी नाहीं सोडविता । पुत्र बंधु कांता संपत्तिचे ॥ ३ ॥
अंतकाळीं कोणी नाहीं बा सांगाती । साधूचे संगतीं हरी जोडे ॥ ४ ॥
कोटि कुळें तारी हरि अक्षरें दोन्ही । एका जनार्दनीं पाठ केलीं ॥ ५ ॥
नामाशिवाय मुख म्हणजे सापाचे बीळच होय व त्यांच्या मुखातील जीभ ही जीभ नव्हे, तर काळसर्पच होय. ।।१।।
त्याची वाचा ही वाचा नसून हडळ आहे. अशा मनुष्याच्या जिण्याला धिक्कार असो ! त्याला नरकात यमयातना भोगाव्या लागतील. ।।२।। (ह्या यातनांमधून) हरी वाचून दुसरा कोणीही सोडवणार नाही. मुलगा, भाऊ, बायको हे सर्व पैशामुळे आहेत. ।।३।।
अरे बाबा, मृत्यू समयी कोणीही आपल्याबरोबर येणार नाही. जो आपल्याला अंतकाळी उपयोगास येईल अश्या हरीची साधूंच्या संगतीत प्राप्ती होते. ।।४।।
जनार्दनीं स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरी ही दोन अक्षरे कोट्यवधी कुळांचा उद्धार करणारी आहेत. म्हणून मी त्यांचेच पठण केले. ।।५।। ६
धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ निर्फळ हरीविण ॥ १ ॥
वेदांताचें बीज हरि हरि अक्षरें । पवित्र सोपारें हेंचि एक ॥ २ ॥
योग याग व्रत नेम दानधर्म । नलगे साधन जपतां हरि ॥ ३ ॥
साधनाचें सार नाम मुखीं गातां । हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी ॥ ४ ॥
नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
ज्या माऊलीने हरिनामाचा जप करणाऱ्या पुत्राला जन्म दिला ती माऊली धन्य होय. ते तिच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचेच फळ होय. हरिनामाचा जप न करणाऱ्या पुत्राला जन्म देणे म्हणजे जन्म न देण्यासारखेच आहे. ।।१।।
हरी हरी ही दोन अक्षरे वेदांचेसूध्दा मूळ आहेत आणि पवित्र व सुलभ हेच एक आहे. ।।२।।
जो हरीचा जप करतो त्याला अष्टांगयोग, यज्ञ, व्रत, नियम, दान, धर्म यापैकी कोणत्याही साधनांची आवश्यकता राहत नाही. ।।३।।
कारण मुखाने हरीचा जप करणे हेच भगवत प्राप्तीच्या सर्व साधनांचे सार आहे. मुखाने हरी हरी म्हटल्याने इष्टकार्य सिध्दीला जाते. ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, जो हरीनाम स्मरण करतो तोच नित्यमुक्त व तोच एक ब्रम्हज्ञानी होय. म्हणून तुम्ही हरीचा अखंड जप करा. ।।५।। ७
बहुतां सुकृतें नरदेह लाधला । भक्तीविण गेला अधोगती ॥ १ ॥
पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मूढा ॥ २ ॥
अनंत जन्मींचें सुकृत पदरीं । त्याचे मुखीं हरि पैठा होय ॥ ३ ॥
राव रंक हो कां उंच नीच याती । भक्तीविण माती मुखीं त्याच्या ॥ ४ ॥
एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ती सायुज्यता पाठी लागे ॥ ५ ॥
अनेक जन्माच्या पुण्याईने मनुष्य देहाची प्राप्ती झाली. परंतु हा जन्म प्राप्त होऊन जिवाने भक्ती केली नाही ; तर त्याला अधोगती प्राप्त होईल. ।।१।।
काय आश्चर्य आहे ! त्याचे दुर्भाग्य असे की , त्याचे कर्म कसे ते संपतच नाही. अरे मूर्खा, (भक्तीने कर्म संपते) हे वर्म तुला कसे कळत नाही !।।२।।
जर मनुष्याने मागील अनेक जन्मात पुण्य संपादन केले असेल तरच त्याच्या मुखात हरिनाम येऊन राहील. ।।३।।
मनुष्य श्रीमंत असो वा गरीब असो, उच्च वर्णाचा असो वा हीन वर्णाचा असो, जर तो हरीची भक्ती करीत नसेल तर त्याच्या मुखात माती पडल्यावाचून राहणार नाही. (त्याचे आयुष्य फुकट गेले असे समजावे.) ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, जर मनुष्य हरी हरी म्हणेल तर सायुज्यता मुक्ती त्याचा पाठलाग करीत येईल. ।।५।। ८
हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥ १ ॥
नित्य नामघोष जयाचे मंदिरीं । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥ २ ॥
वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैचा ॥ ३ ॥
एका तासामाजीं कोटि वेळा सृष्टी । होती जाती दृष्टि पाहें तोचि ॥ ४ ॥
एका जनार्दनीं ऐसें किती झालें । हरिनाम सेविलें तोचि एक ॥ ५ ॥
जो शांत चित्ताने हरीनामरुपी अमृताचे सेवन करतो त्याच्या दृष्टीने मोक्ष हा भुसकट (फोल) आहे. ।।१।।
ज्याच्या घरी अखंड नामघोष चालू असतो त्याचे घर हेच काशीनगरी तीर्थक्षेत्र होय. ।।२।।
वाराणसी हे श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे तरी याला भौम तीर्थ =-(जड) म्हणतात. तीर्थाचे भौम व मानसतीर्थ असे दोन प्रकार आहेत. त्यात भौम तीर्थाचा कालांतराने नाश होतो. पण विचार करून पाहिले असता अविनाशी नामाला नाश कुठला ? ।।३।।
एका तासांमध्ये कोट्यवधी वेळा सृष्टीची घडामोड होत असते, असे तो हरीभक्तच जाणतो. ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, या जगामध्ये असे कितीतरी लोक जन्माला आले व मेले (पण) ज्याने हरिनामाचे सेवन केले तोच धन्य होय. ।।५।। ९
भक्तीविण पशु कशासी वाढला । सटवीने नेला कैसा नाहीं ॥ १ ॥
काय माय गेली होती भूतापासीं । हरि न ये मुखासी अरे मूढा ॥ २ ॥
पातकें करिता पुढें आहे पुसता । काय उत्तर देतां होशील तूं ॥ ३ ॥
अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथें तुजला ॥ ४ ॥
एका जनार्दनीं सांगताहें तोंदें । आहा वाचा रडे बोलतांचि ॥ ५ ॥
हरीची भक्ती न करणारा असा पशु कशाला जगला ? बालकांना घातक अशा काही क्षुद्र देवता आहेत. त्यात 'षष्ठीदेवी' (सटवी) ही एक आहे. म्हणून जुन्या पध्दतीत मूल जन्मल्यानंतर पांचव्याच दिवशी मुलाला तिच्यापासून बाधा होऊ नये, म्हणून तीची पूजा केली जाते. त्या रात्री ती मुलाचे प्रारब्ध लिहावयास येते. तेव्हा तिला उजेड(प्रकाश) लागतो. म्हणून स्रिया रात्रभर दिवा तेवत ठेवतात. त्या लोकरूढीला अनुसरून महाराज म्हणतात या भक्तीहीन, पशुवृत्तीच्या माणसास जन्मताच त्या सटवीने( क्षुद्रदेवतेने) नेले का नाही? नेले असते तर त्याच्या जीवनातील पुढील अनर्थ तरी वाचला असता. ।।१।।
अरे मुर्खा, तू काय भुतापासून जन्माला आलास म्हणून तुझ्या मुखात हरीचे नाम येत नाही. ।।२।।
तू आता अनेक पापकर्म करीत आहेस, पुढे त्याचा जाब विचारणारा यम आहे. त्याने विचारल्यावर तूं काय उत्तर देशील? ।।३।।
यम आपल्या दूतांकडून तुला अनेक प्रकारचा जाच करील. त्यातून तुला कोण सोडविल. ? ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हे मी आपल्या मुखाने तुला सांगतो. पण सांगतांना माझ्या वाणीला शीण होतो.(मला सांगतांना वाईट वाटते.) ।।५।। १०
स्वहिताकारणें संगती साधूची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥ १ ॥
हरि तेथें संत संत तेथें हरी । ऐसें वेद चारी बोलताती ॥ २ ॥
ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे । तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥ ३ ॥
वेदार्थाचा गोंवा कन्याअभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥ ४ ॥
वेदांचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
आपल्या कल्याणाकरिता साधूंची संगती करावी. त्यायोगाने भाव निर्माण होऊन अंतःकरणात भक्ती उत्पन्न होते व हरीची भेट होते. ।।१।।
जेथे हरी तेथे संत व जेथे संत तेथे हरी ! असे चारही वेदांचे सांगणे आहे. ।।२।।
जाणता जो ब्रह्मदेव त्याला सुद्धा वेदांचा अर्थ कळला नाही. तेथे हे (नुसते वेद पाठक) आंधळे (दृष्टीहीन ) निकामी = व्यर्थ ठरतील. ।।३।।
ब्रह्मदेवाने संतांची संगती न करता स्वतःच्याच मनाने वेदांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केल्याने वेदाच्या अर्थाकडे जाऊन त्याचे हित साधण्याच्या बाबतीत अडथळाच झाला. त्याचे मन आपल्या मुलीच्या अभिलाषाच्या जाळ्यात सापडले. पण वेदाने असे काही सांगितले नाही. ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरी ही दोन अक्षरे वेदांची बीजक्षरे आहेत. म्हणून तुम्ही हरी म्हणा. ।।५।। ११
सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया । आनंदपदीं जया म्हणती हरी ॥ १ ॥
सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥ २ ॥
तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥ ३ ॥
हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी नर्कवास ॥ ४ ॥
अस्ति भाति प्रिय ऐशीं पदें तिनी । एका जनार्दनीं तेंचि झालें ॥ ५ ॥
(सच्चिदानंद या पदापैकी) सत् हे पद ब्रह्मवाचक आहे, चित् या पदाने माया निर्दिष्ट केली जाते. व आनंद पदाने ज्याला हरी म्हणतात त्याचा निर्देश केला जातो. ।।१।।
सत् पद हे सगुण आहे व सगुण निर्गुण ही दोन्ही रूपे हरीस्वरूपी समाविष्ट होतात. ।।२।।
मायेच्या पलीकडे असणारी जी वस्तू तिचे तत्सत् या पदाने भगवंतांनी गीतेत वर्णन केले आहे. ।।३।।
भोळ्या भक्तांना हरीच्या पदाची प्राप्ती होते. पण जे अभिमानी आहेत त्यांना जन्ममरणाच्या दुःखाची प्राप्ती होते. ।।४।।
जनार्दनीं स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, अस्ति, भाति, प्रिय अशी जी तीन पदे तीच मी झालो. ।।५।।
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद । वाचेसि सदगद जपे आधी ।।
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteहरिः ॐ
ReplyDeleteधन्यवाद🙏..... आगे का हरिपाठ कहा मीलेगा .🙏
कृपया यापुढील हरिपाठ देखिल लवकरात लवकर उपलब्ध करवून द्यावा ही विनंती जय हरि
ReplyDeleteकृपया पुढील हरिपाठ लवकर द्यावा
ReplyDeleteपुढील हरिपाठ लवकरच ...
ReplyDeleteजय हरी..!
http://eknathbaba.blogspot.com/2022/01/blog-post_25.html
ReplyDeleteखूप आभारी आहे
ReplyDelete