श्री ज्ञानेश्वर महाराजकृत हरिपाठ

    श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत हरिपाठाचे अभंग ॥ श्री गणेशाय नमः ॥
    १ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४ ॥ २ चहूं वेदीं जाण षट्शास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १ ॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तूं दुर्गमा न घालीं मन ॥ ३ ॥ पाठभेद -वायां दुर्गमी न घालीं मन ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥ ३ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥ सगुण निर्गुण गुणांचें अगुण । हरिविणें मत व्यर्थ जाय ॥ २ ॥ अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार । जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३ ॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४ ४ भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ १ ॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ १ ॥ सायासें करिसी प्रपञ्च दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४ ॥ ५ योग याग विधी येणें नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १ ॥ भावेंवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥ तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३ ॥ ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात । साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४ ॥ ६ साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥ १ ॥ कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥ २ ॥ मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ॥ ३ ॥ ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं ॥ ४ ॥ ७ पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ॥ १ ॥ नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरीसी न भजत दैवहत ॥ २ ॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरी ॥ ३ ॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥ ४ ॥ ८ संतांचे संगती मनोमार्गगती । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥ १ ॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥ २ ॥ एकतत्त्वी नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥ ३ ॥ नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥ ४ ॥ सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥ ५ ॥ ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६ ॥ ९ विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे ॥ १ ॥ उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥ २ ॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचें ॥ ४ ॥ १० त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं । चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥ १ ॥ नामासी विन्मुख तो नर पापिया । हरीविण धांवया न पावे कोणी ॥ २ ॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥ ४ ॥ ११ हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥ १ ॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपता हरी ॥ २ ॥ हरिउच्चारण मंत्र पैं अगाध । पळे भूतबाधा भय याचें ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥ ४ ॥ १२ तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी । वायांची उपाधी करिसी जनां ॥ १ ॥ भावबळें आकळे येरवी नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरी ॥ २ ॥ पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥ ४ ॥ १३ समाधि हरीची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥ १ ॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजे सकळ सिद्धि ॥ २ ॥ ऋद्धि सिद्धि अन्य निधि अवघीच उपाधी । जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥ ३ ॥ ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥ ४ ॥ १४ नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥ १ ॥ रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥ २ ॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥ ३ ॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निज स्थान ॥ ४ ॥ १५ एक नाम हरि द्वैतनाम दूरी । अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १ ॥ समबुद्धि घेतां समान श्रीहरी । शमदमां वरी हरि झाला ॥ २ ॥ सर्वांघटी राम देहादेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥ ३ ॥ ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥ ४ ॥ १६ हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ राम कृष्ण ॥ १ ॥ राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धि ॥ २ ॥ सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निमाले साधुसंगे ॥ ३ ॥ ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । तेणें दशदिशा आत्माराम ॥ ४ ॥ १७ हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥ १ ॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥ २ ॥ मतृपितृभ्रात सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥ ३ ॥ ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधलें माझें हातीं ॥ ४ ॥ १८ हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणे कोणी ॥ १ ॥ त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटण ॥ २ ॥ मनोमार्गें गेला तो तेथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥ ३ ॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥ ४ ॥ १९ नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोटी गेलीं त्यांची ॥ १ ॥ अनंत जन्मांचें तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठी ॥ २ ॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठी ॥ ३ ॥ ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म । हरीविण नेम नाहीं दुजा ॥ ४ ॥ २० वेदशास्त्रपुराण श्रुतीचें वचन । एक नारायण सारा जप ॥ १ ॥ जप तप कर्म हरीविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥ २ ॥ हरीपाठी गेले ते निवांताचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥ ३ ॥ ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥ ४ ॥ २१ काळ वेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥ १ ॥ रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥ २ ॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥ ३ ॥ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ॥ ४ ॥ २२ नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्षुमीवल्लभ तयां जवळी ॥ १ ॥ नारायण हरी नारायण हरी । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥ २ ॥ हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ ३ ॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥ ४ ॥ २३ सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वी कळा दावी हरी ॥ १ ॥ तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥ २ ॥ अजपा जपणें उलट प्राणाचा । येथेंही मनाचा निर्धार असे ॥ ३ ॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥ ४ ॥ २४ जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥ १ ॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥ २ ॥ जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात । भजकां त्वरित भावनायुक्त ॥ ३ ॥ ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर केलें ॥ ४ ॥ २५ जाणीव नेणीव भगवंतीं नाही ।न् । हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १ ॥ नारायण हरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥ २ ॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीवजंतूंसीं केवीं कळे ॥ ३ ॥ ज्ञानदेव फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥ ४ ॥ २६ एक तत्त्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥ १ ॥ तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥ २ ॥ नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणि पंथा जाशी झणी ॥ ३ ॥ ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥ ४ ॥ २७ सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ १ ॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरीविण ॥ २ ॥ नाममंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरूनी राहे ॥ ३ ॥ निजवृत्ति हे काढी माया तोडी । इंद्रियांसवडी लपूं नको ॥ ४ ॥ तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करीं ॥ ५ ॥ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥ ६ ॥ २८ अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥ १ ॥ नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥ २ ॥ असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन । उल्हासें करून स्मरण जीवी ॥ ३ ॥ अंतकाळीं तैसा संकटाचें वेळीं । हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥ ४ ॥ संतसज्जनानीं घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवीं तरें ॥ ५ ॥ श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥ ६ ॥ २९ कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥ १ ॥ मी तूं हा विचार विवेक शोधावा । गोविंदा माधवा याच देहीं ॥ २ ॥ देहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवेगळा । सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें तुम्ही जाणा ॥ ४ ॥ ॥ इति श्रीज्ञानदेव हरिपाठ समाप्त ॥

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास