भीष्मपण केला खरा ।
तुका म्हणे -
साधावया भक्तीकाज ।
नाहीं लाज हा धरीत ।।१।।
ऐसियासी शरण जावें ।
शक्ती जीवें न वंची ।।२।।
भीष्मपण केला खरा ।
धनुर्धरा रक्षीलें ।।३।।
तुका म्हणे साक्ष हातीं ।
तो म्यां चित्तीं धरियेला ।।४।।
अर्थ -
भक्तीला सहाय्य होण्याकरिता आणि भक्तांचे रक्षण करण्याकरिता हा देव मनात कसलीही लाज धरत नाही. ।।१।।
जो पूर्ण शक्तीनिशी आपले रक्षण करतो अशा त्या देवाला आपण शरण जावे. ।।२।।
पहा ना ! त्या देवाने भीष्माची प्रतिज्ञाही खरी केली आणि धनुर्धर अर्जुनाचेही रक्षण केले. (परस्परविरोधी गोष्टी एकाच वेळी खऱ्या करून दाखवल्या.) ।।३।।
तुकोबा म्हणतात, भक्ताचे रक्षण करण्याकरिता देव कसलाही विचार करत नाही याबद्दल असलेली संतांची साक्ष माझ्या समक्ष आहे. त्यामुळे मी निःशंकपणे त्या देवाला मनात धारण केले आहे. ।।४।।
।राम कृष्ण हरि।
Comments
Post a Comment