काय पद्मनीचे षंढासी सोहळे ।
श्री संत एकनाथ महाराजकृत
हरिपाठ
🌾🌺अभंग सतरावा🌺🌾
काय पद्मनीचे षंढासी सोहळे ।
वांझेसी डोहाळे कैची होती ॥ १ ॥
अंधापुढें दीप खरासी चंदन ।
सर्पासी दुधपान करूं नये ॥ २ ॥
क्रोधि अविश्वासी त्यासी बोध कैंचा ।
व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये ॥ ३ ॥
खळाची संगती उपयोगासी न ये ।
आपणा अपाय त्याचे संगे ॥ ४ ॥
वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी ।
एका जनार्दनीं तेचि भले ॥ ५ ॥
🍀🌷🌻🍁 भावार्थ🍁🌻🌷🍀
नपुंसकाला पद्मिनीचे सोहळे काय? वांज स्त्रीला डोहाळे कुठले होणार? ।।१।।
आंधळ्यांपुढे दिवा ठेऊ नये, गाढवाला चंदन लावू नये, सर्पाला दूधपान करू नये. (कारण तसे केले तरी त्याचा त्यांना काय उपयोग ?) ।।२।।
जो क्रोधी अविश्वासी आहे त्यास बोध कोठून होणार? म्हणून त्याला बोध करून आपल्या वाणीला शिण देऊ नये. ।।३।।
दुष्ट लोकांची संगती आपल्याला केव्हाही उपयोगी पडणार नाही. उलट त्यामुळे आपला घात मात्र होईल. ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, ज्या वैष्णवांनी असे हे कुपथ्य दूर फेकून दिले तेच शहाणे होत. ।।५।।
🌼🙏आपला दासानुदास 🙏🌼
Comments
Post a Comment