श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ
🔴अभंग पंधरावा🔴
।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।।
एक तीन पांच मेळा पञ्चवीसांच । छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ॥ १ ॥
कल्पना अविद्या तेणे झाला जीव । मायोपाधी शिव बोलिजेति ॥ २ ॥
जीव शिव दोन्ही हरिरूपीं तरंग । सिंधु तो अभंग नेणें हरी ॥ ३ ॥
शुक्तीवरी रजत पाहतां डोळां दिसे । रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ॥ ४ ॥
क्षेत्र-क्षेत्रज्ञातें जाणताती ज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
🌷🌻🍁भावार्थ🍁🌻🌷
कोणी म्हणावं संसार एक तत्वाचा, कोणी तीन तत्वाचा, कोणी पाच तत्वाचा, कोणी पंचवीस तत्वाचा व कोणी छत्तीस तत्वाचा आहे. असे मानतात..!
परंतु, ह्या सर्व तत्वांचे मूळ एक हरिच आहे. ।।१।।
अविद्यारुपी कल्पनेमुळे चैतन्य जीव दशेला प्राप्त होते, आणि मायोपाधीमुळे ते शिव म्हटले जाते. ।।२।।
पण जीव व शिव ह्या दोन्ही हरी स्वरूपावरील लाटा आहेत, मूळ समुद्र सारखा हरी अभंगच आहे. आपल्यावर ह्या लाटा उत्पन्न होतात, हे तो जाणतच नाही. ।।3।।
शिंपल्याकडे बघतांना डोळ्याला रुप्याचा भास होतो व दोरीकडे बघतांना सापाचा भास होतो. (तसेच हरिस्वरूपाच्या ठिकाणी जीव शिवाचा भास होतो) ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, क्षेत्र व क्षेत्रज्ञ ह्यांना (हे हरिच आहेत असे) ज्ञानी जाणतात म्हणून तुम्ही हरी म्हणा. ।।५।।
🌻🙏आपला दासानुदास 🙏🌼
Comments
Post a Comment